गुलाम आणि सिंह - सचित्र - मराठी
गुलाम आणि सिंह
( नीतिकथा ) चित्रे: पॉल गॅल्डन
मराठी अनुवादः सुशील मेन्सन
अॅन्ड्रोकल्स हा एक शांत आणि सहनशील गुलाम होता . पण त्याला मुक्त जीवन जगायची तीव्र इच्छा होती. त्याच्या क्रूर मालकाच्या गुलामगिरीतून सुटण्यासाठी तो एकदा जंगलात पळून गेला. तिथे त्याला एक जखमी सिंह दिसला. सुरुवातीला अॅन्ड्रोकल्स घाबरला. पण मग त्याला असहाय सिंहाची खूप दया आली आणि त्याने सिंहाला मदत केली.
ही नीतिकथा भ्याड लोकांना प्रेरणा देते आणि शूर लोकांचा उत्साह वाढवते . पॉल गॅल्डन यांनी आपल्या मोहक चित्रांनी या कथेला जिवंत केले आहे.
फार फार वर्षांपूर्वी प्राचीन रोम शहरात अॅन्ड्रोकल्स नावाचा गुलाम होता . त्याचा मालक खूप क्रूर होता . अॅन्ड्रोकल्स नेहमी मनाला बजावत असे, “ मला मुक्त व्हायचंय , मला मुक्त व्हायचंय .” एके रात्री सर्वजण गाढ झोपेत असताना तो गुपचुप पळून गेला आणि एका गर्द जंगलात लपून राहीला.
तो जंगलात बराच भटकला, मग दमला आणि भुकेने कासावीस झाला .
जंगलात एक सिंह वेदनेने विव्हळत होता.
सिंहाला पाहून अॅन्ड्रोकल्स घाबरला आणि पळून जाऊ लागला. पण सिंहाने त्याचा पाठलाग केला नाही . तो जास्त जोरात कण्हू लागला. अॅन्ड्रोकल्स मागे वळला आणि सावकाश सिंहाजवळ गेला. सिंह जागेवरून अजिबात हलला नाही. त्याच्या उजव्या पायाचा पंजा सुजला होता आणि त्यातून रक्त वाहात होते, हे अॅन्ड्रोकल्सच्या लक्षात आले . त्या पंजामध्ये एक मोठा काटा रुतला होता आणि त्यामुळे सिंहाला फार वेदना होत होत्या .
अॅन्ड्रोकल्सने आपल्या बोटांनी काटा घट्ट पकडला. प्रचंड वेदना झाल्यामुळे सिंहाने मोठी गर्जना केली. अॅन्ड्रोकल्स भीतीने अर्धमेला झाला. पण शेवटी हळुवारपणे त्याने तो काटा पंजातून बाहेर काढला .
थोड्या वेळाने सिंह जागेवरून उठून उभा राहीला. अॅन्ड्रोकल्स पळून जाण्याच्या तयारीत होता , परंतु सिंहाने एका इमानी कुत्र्यासारखी शेपटी हलवली. तो अॅन्ड्रोकल्सला बिलगला आणि त्याचे हात प्रेमाने चाटू लागला. मग सिंहाने अॅन्ड्रोकल्सला हलकासा धक्का दिला . “ हा मला त्याच्या मागेमागे यायचं सुचवतोय वाटतं ,”
अॅन्ड्रोकल्सच्या मनात आले.
थोड्या वेळाने दोघे सिंहाच्या गुहेत पोहोचले.
थकला- भागला अॅन्ड्रोकल्स तिथेच जमिनीवर झोपी गेला. आपल्याला लपायला जागा मिळाली, एक मित्र मिळाला म्हणून तो खूश होता . दररोज सिंह त्याला खायला मांस आणू लागला. दोघे खूप सुखी होते. पण एके दिवशी…
…..सिंह शिकारीसाठी बाहेर गेला होता, त्यावेळी राजाचे सैनिक पळून गेलेल्या गुलामाचा शोध घेत तिथे पोहोचले . त्यांना गुहेत झोपलेला अॅन्ड्रोकल्स दिसला. लगेच त्याच्या मुसक्या बांधून सैनिक त्याला आपल्यासोबत घेऊन गेले.
__ त्या काळी पळून जाणाऱ्या गुलामांना एका रिंगणात भुकेल्या सिंहासमोर उभा करत असत. राजा तसेच हजारो लोकांसाठी त्या दोघांमधील लढाई पाहाणे , ही निव्वळ करमणुकीची बाब होती.
सैनिकांनी अॅन्ड्रोकल्सला एका छोट्याशा अंधाऱ्या कोठडीत डांबले . अॅन्ड्रोकल्स आपल्या अंतिम दिवसाची वाट पाहू लागला. __ सैनिकांनी एका उग्र सिंहाला एका पिंजऱ्यात डांबले. त्यांनी सिंहाला लढाईच्या दिवसापर्यंत भुकेला ठेवले .
अंधाऱ्या कोठडीतील अॅन्ड्रोकल्सला सिंहाच्या मोठमोठ्या गर्जना ऐकू येत. सिंहाची भूक वाढत चालली होती .
शेवटी तो निर्णायक दिवस उजाडला. आभाळात सूर्य तेजाने तळपत होता . सैनिकांनी अॅन्ड्रोकल्सला कोठडीबाहेर रिंगणात ढकलले. अचानक तेजस्वी प्रकाशात आल्यामुळे त्याचे डोळे दिपून गेले . लोकांच्या उत्साहामुळे आणि आवाजामुळे त्याला भीती वाटू लागली.
Sou
askette
सिंहासनावर बसलेला राजा त्याच्या दरबाऱ्यांसमवेत मोठमोठ्याने हसत -खिदळत होता . अचानक त्याने आपला हात उंचावून इशारा केला. गर्दीत शांतता पसरली.
सिंहाच्या पिजऱ्याचे दार उघडण्यात आले . सिंह एकदम उसळी घेऊन गर्जना करत रिंगणात आला.
अॅन्ड्रोकल्स थरथर कापू लागला. तिथे पळून जायला, लपून राहायला जागाही नव्हती. सिंहाने सभोवती पाहिले आणि मोठ्याने गुरगुरत अॅन्ड्रोकल्सकडे झेप घेतली. “ माझा मृत्यू समीप आलाय ,” डोळे बंद करून , हुंदके देत अॅन्ड्रोकल्स म्हणाला आणि आपल्या मृत्यूची वाट पाहू लागला.
अचानक सिंहाची गर्जना थांबली. त्याच्या पंजांनी अॅन्ड्रोकल्सच्या अंगाची चाळण केली नाही . त्याचे दात अॅन्ड्रोकल्सच्या त्वचेत शिरले नाहीत . याउलट , त्याची खरखरीत , ओलसर जीभ अॅन्ड्रोकल्सला डोक्यापासून पायापर्यंत मायेने चाटू लागली .
तो सिंह त्याचा गुहेतील मित्र होता .
” व्वा व्वा ! ” गर्दीचा आवाज घुमला, “ आता गुलामाला मुक्त करायला हवं . सिंहाला सोडून द्यायल हवं .”
राजा चकीत झाला . त्याने अॅन्ड्रोकल्सला आपल्यासमोर आणून या घटनेचे स्पष्टीकरण विचारले.
” महाराज ,” अॅन्ड्रोकल्स सांगू लागला. राजाने जंगलात घडलेली अॅन्ड्रोकल्सची कहाणी ऐकली. मग त्याने अॅन्ड्रोकल्सची तसेच त्याच्या मित्राची, सिंहाची सुटका करण्याचा हुकूम दिला.
अॅन्ड्रोकल्स आणि सिंह एकत्रच जंगलाच्या दिशेने चालू लागले .
समाप्त