अब्राहम लिंकन
अब्राहम लिंकनचा जन्म फेब्रुवारी १२, इ.स. १८०९ रोजी केंटकी राज्यातील हार्डिन काउंटीमधील सिंकिंग स्प्रिंग फार्मवरील एका खोलीच्या लाकडी खोपट्यात झाला. हा भाग त्या काळात अमेरिकन सरहद्दीवर मानला जात असे. त्यांचे नाव त्यांच्या आजोबांवरून ठेवण्यात आले होते. त्यांचे वडील थॉमस लिंकन व आई नॅन्सी हॅंक्स हे दोघेही निरक्षर शेतकरी होते. जरी नंतरच्या काळात लिंकनच्या लहानपणच्या गरिबीचे व कठीण परिस्थितीचे बरेच वर्णन झाले असले तरी वस्तुतः त्यांचे वडील ते त्या भागतील श्रीमंत नागरिक होते. त्यांनी ३४८ एकराचा सिंकिंग स्प्रिंग फार्म डिसेंबर १८०८ मध्ये २०० डॉलरला विकत घेतला होता. आता ही जागा एक राष्ट्रीय स्मारक म्हणून जतन केली गेली आहे. त्यांचे वडील मुख्य बाप्टिस्ट चर्चमधून गुलामगिरीला असलेल्या विरोधामुळे वेगळे झालेल्या अशा एका बाप्टिस्ट चर्चचे सदस्य होते. त्यामुळे अब्राहम लिंकनला लहानपणापासूनच गुलामगिरीच्या विरोधाचे बाळकडू मिळाले होते. ते स्वतः मात्र वडिलांच्या अथवा इतर कोणत्याच चर्चचा सदस्य झाले नाही.
जमिनीच्या वादामुळे लिंकन कुटुंबाला त्यांच्या जमिनीवरून हलावे लागले. त्यांनी इ.स. १८११ साली जवळच नॉब क्रीक येथे ३० एकर जमीन भाडेपट्टीवर घेतली व तेथे बस्तान हलविले. ही जमिन त्या भागातील उत्तम शेतजमिनींपैकी होती. या काळात लिंकनचे वडील हे एक सन्मान्य नागरीक व यशस्वी शेतकरी व सुतार होते. पुढे इ.स. १८१५ साली जमिनीसंदर्भातील आणखी एका वादामुळे लिंकन कुटुंबाला या जमिनीवरूनही हलावे लागले. या सर्व त्रासास कंटाळून लिंकनच्या वडलांनी इंडियाना राज्यात हलण्याचा निर्णय घेतला. या राज्यातील जमिनीचे केंद्र सरकारने सर्वेक्षण केले असल्याने येथील जमिनींचे कागदपत्र अधिक स्पष्ट व विश्वासार्ह होते. पुढे अब्राहम लिंकनने सर्वेक्षण व वकिली शिकण्यामागे कदाचित या घटनांचा परिणामही असण्याची शक्यता आहे.
अखेर इ.स. १८१६ साली, लिंकन सात वर्षाचे असताना त्यांचे कुटुंब इंडियानामधीलस्पेन्सर काउंटी येथे हलले. लिंकनने या हलण्यामागे आर्थिक परिस्थिती व केंटकीमधील गुलामगिरीची पद्धत अशी दोन कारणे होती असे पुढे सांगितले आहे. लिंकन नऊ वर्षाचे असताना इ.स. १८१८ साली त्यांच्या आईचा दुधातून होणाऱ्या विषबाधेच्या आजारपणामुळे मृत्यू झाला. लवकरच लिंकनच्या वडिलांनी सारा बुश जॉन्स्टन हिच्याशी दुसरा विवाह केला. लिंकनच्या सावत्र आईने त्यांचा स्वतःच्या मुलासारखाच मायेने सांभाळ केला.
आणखी आर्थिक व जमिनीशी निगडित अडचणींनंतर इ.स. १८३० साली लिंकन कुटुंबीयांनी पुन्हा एकदा स्थलांतर केले व इलिनॉय राज्यातील मेकन काउंटी येथे सरकारी जमिनीवर बस्तान हलविले. पुढील वर्षी बावीस वर्षाच्या लिंकनने स्वबळावर जगण्याचे ठरविले व डेंटन ओफुट या व्यापार्यासाठी काम करण्यास सुरुवात केली. त्यांचे काम न्यू सेलम ते न्यू ऑर्लिअन्स येथे बोटीने माल वाहून नेण्याचे होते. असे मानले जाते की या काळात त्यांनी ऑर्लिअन्स येथे गुलांमांचा लिलाव पाहिला व ही घटना त्यांच्या मनात आयुष्यभर घर करून राहिली.
त्यांचे शालेय शिक्षण केवळ १८ महिने विविध शाळांमध्ये फिरत्या शिक्षकांकडून झाले. परंतु हातात पडेल ते पुस्तक वाचण्याच्या सवयीमुळे त्यांचे स्वतःचे स्वतः बरेच शिक्षण झाले. बायबल, शेक्सपियरचे लेखन, व इंग्लिश आणि अमेरिकन इतिहासाचा त्यांनी खोलवर अभ्यास केला. याच काळात त्यांनी अतिशय साधी अशी वक्तृत्व शैली कमावली. या भाषाशैलीमुळे अवघड भाषेतील भाषणे ऐकण्याची सवय असलेल्या श्रोत्यांना सुखद आश्चर्याचा धक्का बसत असे. खाण्याकरितादेखील प्राणी मारण्याची कल्पना त्याना पसंत नसल्याने त्यांनी शिकार व मासेमारी यातही कधी रस घेतला नाही. त्यांची शरीरयष्टी मजबूत व उंची भरपूर असून ते उत्तम दर्जाचा लाकूडतोड्या व कुस्तीपटू होते.