GITANJALI - MARATHI
Gurudev Rabindranath Tagore won Noble prize for his poems names Gitanjali. Here you can read marathi translation of these wonderful poems.
रवींद्रनाथांच्या आणि ‘गीतांजली’च्या सार्वजनिक आयुष्यात दोन दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत. पहिला म्हणजे ‘गीतांजली’चे वाचन पाश्चात्त्य साहित्यविश्वातील मान्यवरांपुढे पहिल्यांदा झाले तो दिवस. तारीख होती- ७ जुल १९१२ आणि स्थळ होते- ‘गीतांजली’चे वाचन घडवून आणण्यात ज्याने पुढाकार घेतला त्या चित्रकार रोथेनस्टाईनचे हॅम्पस्टीड येथील घर. उपस्थितांमध्ये मे सिंक्लेयर, विख्यात कवी डब्ल्यू. बी. येट्स आणि एझरा पाउंड, प्रसिद्ध लेखक एच. जी. वेल्स, गांधी आणि रवींद्रनाथांचे मित्र दीनबंधू सी. एफ. अॅण्ड्रय़ूज आदी मान्यवर होते. स्वत: येट्सने गीतांजलीतील कवितांचे वाचन केले. पण रवींद्रनाथांना श्रोत्यांच्या प्रतिक्रियेचा अंदाज येत नव्हता आणि म्हणून त्यांची स्वत:ची प्रतिक्रियाही संयमाचीच असणे स्वाभाविक होते. अर्थात उपस्थितांच्या ज्या प्रतिक्रिया नंतर आल्या, त्या अतीव प्रशंसेच्या अशाच होत्या. रवींद्रनाथांच्या आणि ‘गीतांजली’च्या सार्वजनिक आयुष्यातील दुसरा महत्त्वाचा दिवस होता- १४ नोव्हेंबर १९१३. याच दिवशी गीतांजलीला नोबेल पारितोषिक मिळाल्याची बातमी रवींद्रनाथांना मिळाली. बातमीची तार दुपारी शांतिनिकेतनात पोहोचली तेव्हा एडवर्ड थॉम्पसन- ज्याच्या भविष्यात पुढे रवींद्रनाथांचा चरित्रकार व्हायचे होते- तोही तेथे उपस्थित होता. नोबेल मिळाल्यावरची रवींद्रनाथांची पहिली प्रतिक्रिया त्यानेच नोंदवून ठेवली आहे. ती अशी- ‘‘आता मला शांतता लाभणार नाही.’’ त्या दिवसानंतर ‘जिथे शांतता लाभेल असे निवाऱ्याचे ठिकाण’ ही शांतिनिकेतनची ओळख जाऊन ‘शांतिनिकेतन- एक प्रदर्शनीय स्थळ’ अशी नवी ओळख निर्माण झाली. यातील कोणते शांतिनिकेतन रवींद्रनाथांना स्वत:साठी व शांतिनिकेतनसाठी हवे होते, याचा निर्णय रवींद्रनाथ शेवटपर्यंत करू शकले नाहीत.