कोरोना विषयी महत्वपूर्ण सूचना

कोरोना विषयी महत्वपूर्ण सूचना

कोरोना वायरस ने जगांत जे थैमान माजवले आहे त्याविरुद्ध लढा पुकारणे आणि ह्या व्हायरस पासून आपल्या प्रियजनांना सुरक्षित ठेवणे हे आमचे आद्य कर्तव्य आहे. जात, धर्म, राजकारण, भाषा इत्यादी सर्व गोष्टी विसरून आम्ही एकजूट पणे लढा पुकारला नाही तर आमच्या देशांत लक्षावधी लोक मृत्युमुखी पडू शकतात. त्यासाठी खालील तथ्य आपण लक्षांत घ्यावी.

 • कोरोना विरुद्ध लढा पुकारणे हे आमचे सर्वांचे कर्तव्य आहे, इथे फक्त सरकार काही करेल अशी अपेक्षा बाळगू नये.
 • बहुतेक तरुण लोकांना संसर्ग झाला तरी त्यांचे काही बिघडणार नाही पण वयोवृद्ध आणि बालकांना त्यापासून धोका आहे.
 • अजून पर्यंत कोरोनावर लस किंवा कोरोना टाळण्यासाठी १००% उपायकारी औषध आले नाही.
 • देशांत हजारो लोक कॉलरा, टीबी इत्यादीने मरत असताना कोरोना ला आम्ही इतक्या गंभीरतेने का घ्यावे ? कॉलरा किंवा टीबी इत्यादी रोग इतके संसर्गजन्य नाहीत. त्याशिवाय कोराना हा १४ दिवस पर्यंत मानवी शरीरांत सुप्त पणे वाढतो. त्यामुळे ह्या १४ दिवसांत बाधित व्यक्ती आणखी शेकडो लोकांना संसर्गित करू शकते. इतका प्रभावशाली संसर्ग १९१८ मध्ये कान्सास फ्लू किंवा स्पॅनिश फ्लू हा झाला होता आणि त्याने सुमारे २ कोटी लोकांचे प्राण घेतले होते.

कोरोना विरुद्ध लढा कसा उभारावा ?

 • सामाजिक संपर्क शक्य तितका कमी करावा. बाहेर जाऊ नये, हस्तांदोलन करू नये, हॉटेलांत जेवू नये. बस ट्रेन विमानाने प्रवास करू नये.
 • ज्यांच्या घरी लहान मुले किंवा वृद्ध लोक असतील तिथे विनाकारण जाऊ नये. गेल्यास सुद्धा इतर व्यक्तींना अजिबात हात लावू नये.
 • आपले हात वारंवार धुवावेत. संबंध लावून किमान २० सेकेंड्स हाथ स्वछ करावेत.
 • भारत देश गरीब आहे, त्यामुळे अमेरिका किंवा इतर देशांत ज्या प्रमाणे लोक सुट्टी घेऊ शकतात तसे करणे इथे अनेक लोकांना शक्य नाही. आपल्या घरी मोलकरीण वगैरे येत असेल तर तिला सुट्टी द्यावी कारण इतर घरांतून किंवा प्रवासातून ती संसर्ग आपल्या घरांत आणू शकते. पण त्याच वेळी शक्य असेल तर तिला आर्थिक मदत करावी.
 • खोकला/शिंक येत असेल तर आपले कोपर वापरून त्यांत खोकावे. त्यामुळे जंतू हवेंत जात नाहीत.
 • तोंडाला हात लावू नये, नाक खाजवू नये, बोटे तोंडांत घालू नये.
 • वृद्ध व्यक्तींनी शक्यतो घराबाहेर पडू नये. मुलांनी शाळेंत किंवा किंवा क्रीडांगणावर जाऊ नये.
 • जेवत खात आसताना अन्न शौच पाळावे, उष्ट्याचे खाऊ नये, आपले ताट पेला वेगळा ठेवावा.
 • कुणाला सर्दी, शिंका येत असतील तर उगाच बाऊ करून सामाजिक बहिष्कार वगैरे टाकू नये, अश्या व्यक्तींच्या संपर्कात ना येता त्यांना मदत करावी आणि अश्या लोकांनी घराबाहेर पडू नये ह्या साठी त्यांना मदत करावी.

Whatsapp, फेसबुक हि अतिशय प्रभावी माध्यमे आहेत. पण विनाकारण कोरोनाचे विनोद, भारत देश कसा महान आहे आणि चिनी लोक कसे घाणेरडे आहेत, आपला लोकल लीडर भाऊ कोरोना विरुद्ध काय करतोय इत्यादी फालतू मेसेजस पाठवू नये. समाजविघातक व्यक्ती कदाचित कोरोनाचा गैरफायदा घेऊन आपले राजकीय अजेंडे पुढे करतील पण त्यांना मदत करू नये. वैद्य हकीम ह्यांचे सल्ले, हळदीचे दूध पिणे इत्यादी उपाय पसरवू नका.

टीव्ही पहा, फेसबुक टिकटॉक वर लोकांशी संपर्क साधा पण बाहेर जाऊ नका !

Information Graphics against Corona Virus Spread

See More Hide

 

 

comments powered by Disqus